विसरु कसा मी गुरुपादुकाला…

ganesh and gurudev-2

इमेज | Posted on by | यावर आपले मत नोंदवा

नमो नम: श्रीगुरुपादुकाभ्याम्।

gurupurnima cover pageकाही दिवसांपूर्वी मी आमच्या गुरुमाऊलींच्या आश्रमात एक भजन ऐकलं. मनाला स्पर्श करुन गेले त्याचे शब्द…. “हमें तुम मिल गये सद्गुरु, सहारा हो तो ऐसा हो। जिधर देखूं, उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो॥” भावमधुर स्वरात प्रथमदर्शनी चित्रपटाचं गीत ऐकतोय असंच वाटावं असं भजन होतं ते…! प्रियकर प्रेयसीचा संदर्भ बदलून गुरूंचा संदर्भ आल्यावर वेगळंच पावित्र्य जाणवलं.
आषाढ महिना लागला की वेध लागतात गुरुपौर्णिमेचे. वेगवेगळ्या क्षेत्रात साधना करणारी मंडळी आठवणीने गुरुपौर्णिमा साजरी करुन आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ‘आषाढ शुद्ध पौर्णिमा’ हा वेदव्यासांचा जन्मदिवस. व्यासांना ‘जगद्गुरु’ म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्मदिवस हा ‘व्यासपौर्णिमा’ वा ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे. ‘गुरु’ ही दोन अक्षरे आहेत पण समुद्राला अमृताने भरल्यावर जशी योग्यता येते तशी किंवा त्यापेक्षा अधिक योग्यता असलेले व आपल्याला विशेष आनंद देणारे असे हे दोन शब्द आहेत. अशा शब्दात गुरूचे मोठेपण आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे.
गुरु म्हणजे अक्षरे दोन । अमृताचा समुद्र जाण ।
तयामध्ये बुडताची क्षण । केवी होय परियेसा ॥
‘गुरु’ या शब्दातील ‘गु’ हे अक्षर अन्धकार वा अज्ञान द्योतित करणारे तर ‘रु’ हे अक्षर तेज वा ज्ञान द्योतित करणारे आहे. त्यामुळे अज्ञान नष्ट करणारे ब्रह्म हे गुरुच होत अशा शब्दात गुरुगीतेत गुरुची योग्यता स्पष्ट केली आहे.
गुकारस्त्वन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते।
अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः॥
प्राचीन भारतात मौखिक पद्धतीने ज्ञान देण्याची परम्परा होती. छपाईच्या कलेचा देखील फ़ारसा विकास झालेला नव्हता. पुस्तके दुर्मिळ होती. अशा काळात ज्ञान देणार्‍या गुरुंना असमान्य महत्त्व असणे हे साहजिक होते. सोबत ह्याही गोष्टीचा विचार करणे आवश्यक की बहुतेक वेळा ‘गुरु’ ज्ञानी होते त्याचबरोबर पारमार्थिकदृष्ट्या ‘अनुभव’ घेतलेले होते. आजच्या काळात देखील जो आपल्याला शिकवतो तो गुरु अशा अर्थाने ‘Guru’ हा शब्द इंग्रजीतदेखील रूढ झाला आहे. प्राचीन काळी गुरुची महती वर्णन करणारे काही खास वाङ्मय होते का या मुद्द्यावर विचार करत असताना गुरुगीता सापडली. खूप वर्षांपासून ‘गुरूगीता’ या ग्रंथाबद्दल मला कुतुहल वाटत होतं. गुरूगीतेच्या ‘बृहद्’ आणि ‘लघु’ अशा दोन संहिता आहेत हे कळलं. स्कंदपुराणाच्या उत्तरखंडातील शिवपार्वती संवादात गुरुगीता आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला गुरूचे महत्त्व समजावून सांगितले आहे. म्हणजे ही रचना पौराणिक काळातील असली पाहिजे.
गुरुगीता पहात असताना लघुसंहितेच्या सुरुवातीला ‘गुरूपादुकापंचकम्’ हे प्रासादिक स्तोत्र सापडलं. अक्षरश: हर्षवायू व्हायचा बाकी होता. जेव्हा केव्हा सत्संगात हे स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा तेव्हा मनाला अतिशय भिडतं. ‘गुरूपादुका’ अर्थात लाक्षणिक अर्थाने गुरूचीच महती या स्तोत्रात सांगितली आहे. जेमतेम पाच श्लोकांच्या या स्तोत्रात गुरुचा सहवास आपल्या आयुष्यात काय काय घडवू शकतो हे फ़ार सुरेख स्पष्ट केले आहे. या स्तोत्राच्या प्रासादिक शैलीमुळे शब्दप्रतीती मग अर्थप्रतीती सहज होते. याला अनुभूतीची जोड आली तर खरोखर बहार येईल.
या स्तोत्राच्या सुरुवातीच्या मंगलचरणात गुरुंना, गुरुंच्या, परगुरूंना, परगुरुंच्या पादुकांना सिद्धांचार्यांच्या पादुकांना वंदन केले आहे. तर दुसर्‍या श्लोकात ऐं, ह्रीं श्रीं या बीजमंत्रांचा गूढ अर्थ, ॐकाराचे मर्म जाणवून देणाऱ्या गुरूपादुकांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना आढळते. पुढच्या श्लोकात होत्र ( अग्निहोत्र) हौत्र ( श्रौत याग करण्यासाठी अग्निचयन करून निर्माण केला जाणारा अग्नी), हविष्य ( यज्ञात द्यायच्या आहुती-घृत इत्यादी) होतृ ( होता म्हणजे पुरोहित) , होम या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत त्या एकच आहेत याची जाणीव करून देणाऱ्या, ते जे ब्रह्म तत्त्व आहे त्याचा बोध करून देणाऱ्या गुरूपादुका आहेत असे वर्णन आढळते. तर पुढील श्लोकात षड्रिपूंना वश करून , विवेक आणि वैराग्यरूपी धन गुरूसहवासाने प्राप्त होते. प्रबोध होतो आणि लवकर मोक्ष प्राप्त होतो असा उल्लेख येतो. अनन्त संसाररुप सागराला पार करण्यासाठी ज्या नौकारुप आहेत, अविचल भक्ति देणाऱ्या आहेत, आळस वा बुद्धिमांद्यरुप जडत्वाच्या सागराला शुष्क करण्यासाठी ज्या वडवानलासमान आहेत त्या गुरूपादुकांना माझा नमस्कार असो असा शेवटच्या श्लोकात उल्लेख आहे. गुरुसहवास हा मोक्षदायक आहे असेच पुराणकारांस म्हणावयाचे आहे.
भवभयतारक प्रबोध देणारे भगवान शंकर रुसले तर गुरु तारून नेतील पण गुरु रागावले तर कोण तारुन नेणार? म्हणून शक्यतोवर गुरूला प्रसन्न ठेवावे असे गुरुगीतेत म्हटले आहे. आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फ़ोट होत असताना गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व कितपत पटेल कुणास ठाऊक? परंतु ‘कसे शिकायचे’ हे कोणीतरी शिकवले असेल तरच उपलब्ध माहितीतून शिकता येते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गुरु हा हवाच…! ‘गुरु रविकर, तमनाशक, अक्षय हे पदी मस्तक…!’-श्रेया महाजन.

Posted in लेख | यावर आपले मत नोंदवा

विवरण-श्लोक २

बीजस्यान्तरिवाङ्कुरो जगदिदं प्राङ्निर्विकल्पं पुनः,

मायाकल्पितदेशकालकलनावैचित्र्यचित्रीकृतम्‌।

मायावीव विजृम्भयत्यपि महायोगीव यः स्वेच्छया,

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ॥२॥

 ब्रह्म आणि विश्व यांच्यातील ‘कार्यकारण भाव’ शंकराचार्य या श्लोकात स्पष्ट करीत आहेत. ब्रह्मतत्त्व हे अनादि आहे, ते स्वयंभू, सर्वशक्तिमान , परिपूर्णशक्तीने युक्त  आहे.  विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी त्याला कोणत्याही  साधनांची आवश्यकता नसते हा शंकराचार्यांचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत ! तो स्पष्ट करण्यासाठी ते इथे बीजांकुरन्यायाचा आधार घेतात. बीजामधे ही शक्ती असते की त्याने अंकुरात परिणत व्हावे, त्याप्रमाणे ब्रह्मामधे देखील विश्वात परिणत होण्याची शक्ती असते. निर्मितीपूर्वी हे विश्व त्या ब्रह्मामध्ये निर्विकल्प, सुप्त अवस्थेत असते. मायेने त्याला देश, काल इ. भेदाभेद दाखवून प्रत्यक्षात आणले जाते. एखादा गारुडी/मांत्रिक आपल्या जादूविद्येने अचानक काही गोष्टी निर्माण करतो वा एखादा योगी ज्याप्रमाणे चमत्कार घडवतो त्याप्रमाणे हे आहे. नासदीय सूक्तामधे देखील सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी काहीच नव्हते अशा प्रकारचे उल्लेख आढळतात. ‘लीलामात्रं तु कार्त्स्न्यम् ।’ अशासारख्या ब्रह्मसूत्रांत सुद्धा केवळ स्वेच्छेने खेळ म्हणून ही सृष्टी निर्माण झाली, असे उल्लेख आढळतात. या विश्वाच्या पसार्‍यामागचा कार्यकारणभाव ज्यामुळे समजतो अशा त्या श्री दक्षिणामूर्ती ला माझा नमस्कार असो. 

या श्लोकात दक्षिणामूर्ती रूपातील शिवाच्या  स्रष्ट्रुत्व या गुणाचा उहापोह होतो आहे.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

विवरण श्लोक १

विश्वं दर्पणदृश्यमाननगरी तुल्यं निजान्तर्गतं.

पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया ।  

यस्साक्षात् कुरु ते प्रबोध समये स्वात्मानमेवाद्वयं ,

तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ॥1||

 आरशात एखाद्या नगरीचे प्रतिबिंब पहावे आणि तीच खरी नगरी आहे असे वाटावे. किंवा झोपले असताना स्वप्नात पाहिलेली गोष्टच प्रत्यक्षात खरी आहे असे वाटते त्याप्रमाणे विश्व हे आत्मतत्त्वाच्या ठिकाणी प्रतिबिंबित होते.प्रतिबिंब हा शेवटी आभास असतो, सत्य नाही, याची कालांतराने जाणीव होते. त्याप्रमाणेच अज्ञान आणि मायेच्या आवरणामुळे विश्व हे ब्रह्माहून वेगळे आहे असे वाटते.  प्रत्यक्षात एकमेवाद्वैतीय ब्रह्म हे नित्य आणि विश्व हे अनित्य, त्यावर भासमान होणारे आहे. मन, इंद्रिये, बुद्धी यांना हे प्रतिबिंबच गोचर होते. खरे आत्मतत्त्व नाही. नित्य काय आणि अनित्य काय हे  ज्ञान केवळ प्रबोध वा आत्मज्ञान जेव्हा होते त्याचवेळी पटते. हे आत्मज्ञान ज्या शंकरामुळे होते त्या गुरुमूर्तीला माझा नमस्कार असो.

या पहिल्याच श्लोकात श्रीमत शंकराचार्य त्यांच्या सुप्रसिद्ध ‘मायावादाच्या’ सिद्धांताचा उल्लेख करतात. ‘माया’ या शब्दाचा अर्थ अगदी सरल आहे. ‘या मा सा माया ।‘ जी खरी (नित्य ) नव्हे ती माया. या मायेच्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत . एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप शक्ती.  हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अनेक वेळा श्री शंकराचार्यांनी रज्जुसर्पदृष्टांताचा आधार घेतला आहे. अंधारात एखादी दोरी दिसली तरीही आपणाला तो साप आहे असे वाटते. इथे मूळ दोरीच्या अस्तित्वाची जाणीव न होणं ही आवरण शक्ती आणि साप असल्यासारखे वाटणे, म्हणजे मूळ वस्तुपेक्षा भलतेच कसले ज्ञान होणे ह्याला म्हणतात विक्षेप शक्ती.

 आत्मतत्त्वाचे ज्ञान होण्याऐवजी आपल्याला आजूबाजूला जे विश्व दिसते ते नित्य वाटते यातही ब्रह्मतत्त्वाच्या ज्ञानावर आवरण पडणे ही मायेची आवरणशक्ती आणि त्याऐवजी भासमान , प्रतिबिंबित होणारे विश्व हेच सत्य वाटणे ही विक्षेप शक्ती. ज्ञानप्राप्ती झाली की मायेचे आवरण गळून पडते आणि यथातथ्य ज्ञान होते. हा प्रबोध घडवणारी गुरुस्वरूप देवता म्हणून दक्षिणामूर्ती या देवतेला माझा नमस्कार असो.

Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया

गणपती बाप्पा मोरया!

गणानां त्वां गणपतिं हवामहे|


Posted in संपादकीय-- Home Page | यावर आपले मत नोंदवा

मधुराष्टकम्– श्रेया महाजन.

गोकुळाष्टमीचे रंग अजून वातावरणात तरळत आहेत. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’… अशा शब्दात सुरेश भटांनी या रासक्रीडेचं वर्णन केलं,  ‘राधाधरमधुमिलिंद जय जय..’अशा शब्दात अण्णासाहेब किर्लोस्करांनी जयजयकार केला, ‘राधा कृष्णावरी भाळली’ म्हणत पी. सावळारामानी त्यांच्या मीलनाचं वर्णन केलं , असा ‘कृष्ण’.  त्याचं सारं वर्तन …अवतीभवतीचं विश्वच मधुर ….गोड , सारं मुरलीच्या स्वरांनी नादावलेलं, भक्तीरसाने भारावलेलं !

या विचारांच्या आवर्तात आठवलं ते ‘मधुराष्टकम्’. श्रीमद् वल्लभाचार्यांची प्रासादिक रचना ज्यात पुष्टिमार्गीय भक्तीचे सूर आळवलेले आहेत.  त्या कृष्णाच्या वाणीत गोडवा, त्याचं चालणं सुडौल, हसणं लाघवी, वस्त्रप्रावरणं आकर्षक, गळ्यातले हार सुगंधी , त्याने वाजवलेला पावा वेड लावणारा, सुस्वर, रूप मनोहारी, अंगप्रत्यंग लावण्यमयी, त्याचं नृत्य सुंदर, हातातलं लीलाकमळ अप्रतिम, गोपी, यमुनेचा परिसर सारं अतिशय मधुर्….खरं तर त्याचं अस्तित्व सार्‍या अणुरेणुत भरून राहिलंय ! त्यामुळेच हे सारं मधुर, हवंहवंसं आहे.

मोठं विलक्षण आहे हे स्तोत्र. जग मिथ्या, खोटं असं नाहीच. ती परमेश्वराची निर्मिती आहे. ती सुंदरच असणार आणि खरी देखील!  हा विचार किती प्रभावीपणे मांडलाय इथे. वल्लभाचार्य हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते. भगवंताची भक्ती हाच त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असा विचार त्यांनी आपल्या भाष्यांतून मांडला. बाळकृष्णाची वात्सल्यभावाने भक्ती या मार्गात सांगितली आहे. नामजपाला खूप महत्त्व दिले आहे.

सगुण साकार स्वरूपात परमेश्वराची भक्ती केल्यास गोलोक प्राप्त होतो. हीच मुक्ती होय असा विचार त्यांनी मांडला. कृष्णाच्या जन्मदिनी या स्तोत्राने त्याचे स्मरण करू.

मधुराष्टकम्|

अधरं मधुरं, वदनं मधुरं, नयनं मधुरं, हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं, गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ १ ॥

वचनं मधुरं, चरितं मधुरं, वसनं मधुरं, वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ २ ॥

वेणुर्मधुरो, रेणुर्मधुरः , पाणिर्मधुरः , पादौ मधुरौ ।

नृत्यं मधुरं, सख्यं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ३ ॥

गीतं मधुरं, पीतं मधुरं, भुक्तं मधुरं, सुप्तं मधुरम् ।

रूपं मधुरं, तिलकं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ४ ॥

करणं मधुरं, तरणं मधुरं, हरणं मधुरं, रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं, शमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ५ ॥

गुञ्जा मधुरा, बाला मधुरा, यमुना मधुरा, वीची मधुरा ।

सलिलं मधुरं, कमलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ६ ॥

गोपी मधुरा, लीला मधुरा, युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं, शिष्टं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ७ ॥

गोपा मधुरा, गावो मधुरा, यष्टिर्मधुरा, सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं, फलितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ८ ॥

॥इति श्रीमद्वल्लभाचार्यविरचितं मधुराष्टकं सम्पूर्णं ॥

हे येथे ऐकायला मिळेल.

hwatch?v=cTQuErgyd_M&feature=related

___________________________________________________

सौ. श्रेया श्रीधर महाजन. सनिव्हेल, कॅलिफोर्निया.

********************************************

Posted in लेख | 2 प्रतिक्रिया

शिष्यपरीक्षायै भेरीदृष्टान्तः | — श्रेया महाजन.

काही दिवसांपूर्वी एक सुभाषित वाचनात आले. ‘व्यसने मित्रपरीक्षा …’ संकटात मित्राची परीक्षा होते, शूराची रणांगणावर, विनयशीलतेवरून नोकराची आणि दानशूरतेची परीक्षा दुष्काळात होते. मनात विचार आला, शिष्याची परीक्षा कशी घेतात? आताच्या परीक्षापद्धतीसारखी काही पद्धत पूर्वी होती का? की आज्ञाधारकपणा वगैरे गुण असले की पुरे? ‘आज्ञा गुरूणामविचारणीया |’ गुरूने आज्ञा केली की प्रतिप्रश्न न करता पालन करावे हे तर प्रसिद्धच आहे. परंतु शिष्याच्या परीक्षेसाठी भेरी म्हणजे नगार्‍याचा दृष्टान्त वापरलेला एका जैन ग्रन्थात आढळला.

नन्दीसूत्र हा जैनांचा पवित्र आगम ग्रंथ. त्यात शिष्याने कसे असावे हे सांगत असताना ही गोष्ट आढळली.

असे सांगतात की द्वारकानगरीमधील सगळे रोग दूर व्हावे म्हणून श्रीकृष्णाने तत्कालीन राजाला एक नगारा दिला. हा नगारा अद्वितीय होता. गोशीर्ष नावाच्या चंदनापासून तयार केलेला होता. दर सहा महिन्यानी हा वाजवायचा, नीट रक्षण करायचे. जो याचा आवाज ऐकेल त्याचे पूर्वीचे सगळे रोग बरे होतील आणि पुढचे सहा महिने ती व्यक्ती रोगमुक्त राहील. याचा आवाज चौदा योजने पसरेल. राजाने एका माणसाला नियुक्त केले , त्याने नगारा वाजवला आणि पुढची रक्षणाची जबाबदारी पण त्याचीच होती.


काही दिवस निघून गेले. मग एक महारोगाने ग्रासलेला रोगी तेथे आला, आपले आयुष्य आता सहा महिन्यांचे देखील उरले नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याने नगारारक्षकाला विनंती केली–‘या नगार्‍याचा एक छोटासा तुकडा मला द्यावा. तो उगाळून प्यायल्याने कदाचित माझा आजार बरा होईल.’ रक्षकाने थोडीशी लाच घेऊन त्याला एक तुकडा दिला.

गतानुगतिको लोका: | लोक दुसर्‍याचे अनुसरण करणारे असतात. एक मग दुसरा मग तिसरा अशा अनेक लोकानी त्या नगार्‍याचे तुकडे नेले, त्याबदल्यात साधे चामड्याचे तुकडे लावले.

सहा महिने निघून गेले. पुन्हा नगारा वाजवण्याचा दिवस उजाडला. तो नगारा वाजवल्यावर त्याचा नाद राजदरबारातही घुमला नाही. त्याचे दैवी सामर्थ्य कमी झाले. राजाने त्याचे निरीक्षण केले तेव्हा एखाद्या गोधडीसारखी ठिगळे त्याला लावलेली दिसली.  त्याने रक्षकाला कामावरून कमी केले आणि देवाने त्याला दुसरा नगारा दिला.

ही गोष्ट सांगून पुढे जैन महामुनी सांगतात….शिष्याची परीक्षा देखील अशीच करावी. गुरुने दिलेले ज्ञान व्यवस्थित जतन करणारा तो चांगला शिष्य! त्याने मिळालेल्या ज्ञानाची मोडतोड करायची नाही, तर योग्य उपयोग करायचा. अन्यथा त्या ज्ञानाचे दैवी गुण नष्ट होतात. ज्याला अमूल्य ज्ञान सांभाळता येते त्यालाच ते द्यावे….शिष्याय देयम्, अशिष्याय न देयम्| या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सद्गुरुंनी जे ज्ञान आपल्याला वेळोवेळी दिले, ते सांभाळणे, वृद्धिंगत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

श्रेया महाजन-कॅलिफोर्निया.

*                 *                  *               *                    *            *             *               *               *             *

Posted in लेख | १ प्रतिक्रिया

कधी कधी आम्ही असे का करतो?—श्री. राजेंद्र थोरवे–अहमदनगर.

श्रीगुरु परखडपणे स्पष्ट आणि सरळ शब्दांत आपले मत सांगत. श्रीगुरुंनी माझ्याशी बोलताना एकदा एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले,”आम्ही कधी कधी असे कठोर वर्तन का करतो? रागावतो ते का रागावतो? त्याचे कारण असे की, आम्ही तुम्हाला स्वीकारले आहे; म्हणजे खराब कपडा धुवायला घेतला आहे. अस्वच्छ कपडा धुवायचा म्हणजे काही सोपे काम नाही. प्रथम तो भिजत घालायला लागतो. भिजत घातल्याशिवाय त्यातून काही घाण निघू शकत नाही. भिजत घातल्यानंतर त्याला घासावे लागते, आपटावे लागते, धोपटावे लागते, लागेल तेव्हढा मार द्यावा लागतो. त्यातूनही सगळे डाग निघतीलच असे नाही. त्याकरिता काही रसायन घालावे लागते, थोडे लिंबू लावावे लागते, कोठे रॉकेल लावावे लागते, कोठे पेट्रोल लावावे लागते. काही पक्के डाग काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापराव्या लागतात, मग तो धुवून खळबळावा लागतो. पुन्हा उन्हात वाळवावा लागतो. इस्त्रीचे चटके द्यावे लागतात. तेव्हा कुठे तो कपडा घालायच्या कामाला येतो.”

ते पुढे म्हणाले,”तुम्हाला जरी वाटत असेल की मी तुमच्यावर रागावतो, तुम्हाला हाकलून देतो, तुमच्यावर ओरडतो, वेळप्रसंगी तुम्हाला शिक्षा करतो, पण त्याचे कारण असे की तुमचे जे वेगवेगळे डाग आहेत ते मला घालवायचे असतात. तुम्ही पूर्वी काय काय केले होते ते तुम्हाला माहिती नाही,  पण मी पाहात असतो, त्यासाठी हे सगळे करावे लागते. प्रसंगी चटकेही द्यावे लागतात. कारण त्याशिवाय शिष्यत्वाची पात्रता येत नाही.”

हे उदाहरण मला खूप आवडले. आपली चित्तशुद्धी व्हावी यासाठी सद्गुरुंना काय काय करावे लागते याची कल्पना आली. ‘वह्नौ वारशतं क्षिप्तं सुवर्णमेव सुवर्णगुणातिरेकेण प्रकाशते |’ — मुशीतून तापवलेले सोनेच झळाळते, तेदेखील शेकडो वेळा तापवल्यावर ! गुरुदेखील अनेक वेळा परीक्षा घेऊन शिष्याची तयारी तपासत असतात, तेव्हाच शंभर नंबरी वाजणारं नाणं तयार होतं…!

श्री. राजेंद्र थोरवे- अहमदनगर.

_____________________________________________________________

Posted in सद्गुरुंच्या आठवणी | 2 प्रतिक्रिया

अखेरचे आठ दिवस !! —सायली थत्ते

एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबद्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल.
एकनाथ
हसले; आणि, ‘केंव्हातरी याची उत्तरे देईन‘, म्हणून त्यांनी सांगितले.

काही
दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, “ तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस.”
तो
गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती
त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, “तुमच्या कृपेने वाचलो.”
एकनाथ
मान डोलवित म्हणाले, “आता मी तुम्हाला दुसया प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?”

तो
गृहस्थ उत्साहाने म्हणाला, “कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुसयावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायकामुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजायाचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले.”

एकनाथ
समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, “हे तुझ्या दुसया प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो

संकलन–सायली थत्ते–पुणे

====================================================

Posted in संकलित लेखन | 2 प्रतिक्रिया

छायाचित्रे…१- निलेश महाजन

This slideshow requires JavaScript.

[निलेश महाजन, पुणे यांच्या सौजन्याने]

Posted in छायाचित्रे | 4 प्रतिक्रिया