शिष्यपरीक्षायै भेरीदृष्टान्तः | — श्रेया महाजन.

काही दिवसांपूर्वी एक सुभाषित वाचनात आले. ‘व्यसने मित्रपरीक्षा …’ संकटात मित्राची परीक्षा होते, शूराची रणांगणावर, विनयशीलतेवरून नोकराची आणि दानशूरतेची परीक्षा दुष्काळात होते. मनात विचार आला, शिष्याची परीक्षा कशी घेतात? आताच्या परीक्षापद्धतीसारखी काही पद्धत पूर्वी होती का? की आज्ञाधारकपणा वगैरे गुण असले की पुरे? ‘आज्ञा गुरूणामविचारणीया |’ गुरूने आज्ञा केली की प्रतिप्रश्न न करता पालन करावे हे तर प्रसिद्धच आहे. परंतु शिष्याच्या परीक्षेसाठी भेरी म्हणजे नगार्‍याचा दृष्टान्त वापरलेला एका जैन ग्रन्थात आढळला.

नन्दीसूत्र हा जैनांचा पवित्र आगम ग्रंथ. त्यात शिष्याने कसे असावे हे सांगत असताना ही गोष्ट आढळली.

असे सांगतात की द्वारकानगरीमधील सगळे रोग दूर व्हावे म्हणून श्रीकृष्णाने तत्कालीन राजाला एक नगारा दिला. हा नगारा अद्वितीय होता. गोशीर्ष नावाच्या चंदनापासून तयार केलेला होता. दर सहा महिन्यानी हा वाजवायचा, नीट रक्षण करायचे. जो याचा आवाज ऐकेल त्याचे पूर्वीचे सगळे रोग बरे होतील आणि पुढचे सहा महिने ती व्यक्ती रोगमुक्त राहील. याचा आवाज चौदा योजने पसरेल. राजाने एका माणसाला नियुक्त केले , त्याने नगारा वाजवला आणि पुढची रक्षणाची जबाबदारी पण त्याचीच होती.


काही दिवस निघून गेले. मग एक महारोगाने ग्रासलेला रोगी तेथे आला, आपले आयुष्य आता सहा महिन्यांचे देखील उरले नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याने नगारारक्षकाला विनंती केली–‘या नगार्‍याचा एक छोटासा तुकडा मला द्यावा. तो उगाळून प्यायल्याने कदाचित माझा आजार बरा होईल.’ रक्षकाने थोडीशी लाच घेऊन त्याला एक तुकडा दिला.

गतानुगतिको लोका: | लोक दुसर्‍याचे अनुसरण करणारे असतात. एक मग दुसरा मग तिसरा अशा अनेक लोकानी त्या नगार्‍याचे तुकडे नेले, त्याबदल्यात साधे चामड्याचे तुकडे लावले.

सहा महिने निघून गेले. पुन्हा नगारा वाजवण्याचा दिवस उजाडला. तो नगारा वाजवल्यावर त्याचा नाद राजदरबारातही घुमला नाही. त्याचे दैवी सामर्थ्य कमी झाले. राजाने त्याचे निरीक्षण केले तेव्हा एखाद्या गोधडीसारखी ठिगळे त्याला लावलेली दिसली.  त्याने रक्षकाला कामावरून कमी केले आणि देवाने त्याला दुसरा नगारा दिला.

ही गोष्ट सांगून पुढे जैन महामुनी सांगतात….शिष्याची परीक्षा देखील अशीच करावी. गुरुने दिलेले ज्ञान व्यवस्थित जतन करणारा तो चांगला शिष्य! त्याने मिळालेल्या ज्ञानाची मोडतोड करायची नाही, तर योग्य उपयोग करायचा. अन्यथा त्या ज्ञानाचे दैवी गुण नष्ट होतात. ज्याला अमूल्य ज्ञान सांभाळता येते त्यालाच ते द्यावे….शिष्याय देयम्, अशिष्याय न देयम्| या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सद्गुरुंनी जे ज्ञान आपल्याला वेळोवेळी दिले, ते सांभाळणे, वृद्धिंगत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

श्रेया महाजन-कॅलिफोर्निया.

*                 *                  *               *                    *            *             *               *               *             *

This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

1 Response to शिष्यपरीक्षायै भेरीदृष्टान्तः | — श्रेया महाजन.

  1. harshall म्हणतो आहे:

    Supatra mile to kupatra ko daan diya na diya , su shishya mile to ku shishya ko gyan diya na diya , kahe kavi gang suun sha akbar , PURAN GURU mila too kissi aur koo namaskar kiya na kiya …..

    ….This is a famous quote by Kavi Gang narrated to Akbar .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s