नमो नम: श्रीगुरुपादुकाभ्याम्।

gurupurnima cover pageकाही दिवसांपूर्वी मी आमच्या गुरुमाऊलींच्या आश्रमात एक भजन ऐकलं. मनाला स्पर्श करुन गेले त्याचे शब्द…. “हमें तुम मिल गये सद्गुरु, सहारा हो तो ऐसा हो। जिधर देखूं, उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो॥” भावमधुर स्वरात प्रथमदर्शनी चित्रपटाचं गीत ऐकतोय असंच वाटावं असं भजन होतं ते…! प्रियकर प्रेयसीचा संदर्भ बदलून गुरूंचा संदर्भ आल्यावर वेगळंच पावित्र्य जाणवलं.
आषाढ महिना लागला की वेध लागतात गुरुपौर्णिमेचे. वेगवेगळ्या क्षेत्रात साधना करणारी मंडळी आठवणीने गुरुपौर्णिमा साजरी करुन आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ‘आषाढ शुद्ध पौर्णिमा’ हा वेदव्यासांचा जन्मदिवस. व्यासांना ‘जगद्गुरु’ म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्मदिवस हा ‘व्यासपौर्णिमा’ वा ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे. ‘गुरु’ ही दोन अक्षरे आहेत पण समुद्राला अमृताने भरल्यावर जशी योग्यता येते तशी किंवा त्यापेक्षा अधिक योग्यता असलेले व आपल्याला विशेष आनंद देणारे असे हे दोन शब्द आहेत. अशा शब्दात गुरूचे मोठेपण आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे.
गुरु म्हणजे अक्षरे दोन । अमृताचा समुद्र जाण ।
तयामध्ये बुडताची क्षण । केवी होय परियेसा ॥
‘गुरु’ या शब्दातील ‘गु’ हे अक्षर अन्धकार वा अज्ञान द्योतित करणारे तर ‘रु’ हे अक्षर तेज वा ज्ञान द्योतित करणारे आहे. त्यामुळे अज्ञान नष्ट करणारे ब्रह्म हे गुरुच होत अशा शब्दात गुरुगीतेत गुरुची योग्यता स्पष्ट केली आहे.
गुकारस्त्वन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते।
अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः॥
प्राचीन भारतात मौखिक पद्धतीने ज्ञान देण्याची परम्परा होती. छपाईच्या कलेचा देखील फ़ारसा विकास झालेला नव्हता. पुस्तके दुर्मिळ होती. अशा काळात ज्ञान देणार्‍या गुरुंना असमान्य महत्त्व असणे हे साहजिक होते. सोबत ह्याही गोष्टीचा विचार करणे आवश्यक की बहुतेक वेळा ‘गुरु’ ज्ञानी होते त्याचबरोबर पारमार्थिकदृष्ट्या ‘अनुभव’ घेतलेले होते. आजच्या काळात देखील जो आपल्याला शिकवतो तो गुरु अशा अर्थाने ‘Guru’ हा शब्द इंग्रजीतदेखील रूढ झाला आहे. प्राचीन काळी गुरुची महती वर्णन करणारे काही खास वाङ्मय होते का या मुद्द्यावर विचार करत असताना गुरुगीता सापडली. खूप वर्षांपासून ‘गुरूगीता’ या ग्रंथाबद्दल मला कुतुहल वाटत होतं. गुरूगीतेच्या ‘बृहद्’ आणि ‘लघु’ अशा दोन संहिता आहेत हे कळलं. स्कंदपुराणाच्या उत्तरखंडातील शिवपार्वती संवादात गुरुगीता आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला गुरूचे महत्त्व समजावून सांगितले आहे. म्हणजे ही रचना पौराणिक काळातील असली पाहिजे.
गुरुगीता पहात असताना लघुसंहितेच्या सुरुवातीला ‘गुरूपादुकापंचकम्’ हे प्रासादिक स्तोत्र सापडलं. अक्षरश: हर्षवायू व्हायचा बाकी होता. जेव्हा केव्हा सत्संगात हे स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा तेव्हा मनाला अतिशय भिडतं. ‘गुरूपादुका’ अर्थात लाक्षणिक अर्थाने गुरूचीच महती या स्तोत्रात सांगितली आहे. जेमतेम पाच श्लोकांच्या या स्तोत्रात गुरुचा सहवास आपल्या आयुष्यात काय काय घडवू शकतो हे फ़ार सुरेख स्पष्ट केले आहे. या स्तोत्राच्या प्रासादिक शैलीमुळे शब्दप्रतीती मग अर्थप्रतीती सहज होते. याला अनुभूतीची जोड आली तर खरोखर बहार येईल.
या स्तोत्राच्या सुरुवातीच्या मंगलचरणात गुरुंना, गुरुंच्या, परगुरूंना, परगुरुंच्या पादुकांना सिद्धांचार्यांच्या पादुकांना वंदन केले आहे. तर दुसर्‍या श्लोकात ऐं, ह्रीं श्रीं या बीजमंत्रांचा गूढ अर्थ, ॐकाराचे मर्म जाणवून देणाऱ्या गुरूपादुकांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना आढळते. पुढच्या श्लोकात होत्र ( अग्निहोत्र) हौत्र ( श्रौत याग करण्यासाठी अग्निचयन करून निर्माण केला जाणारा अग्नी), हविष्य ( यज्ञात द्यायच्या आहुती-घृत इत्यादी) होतृ ( होता म्हणजे पुरोहित) , होम या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत त्या एकच आहेत याची जाणीव करून देणाऱ्या, ते जे ब्रह्म तत्त्व आहे त्याचा बोध करून देणाऱ्या गुरूपादुका आहेत असे वर्णन आढळते. तर पुढील श्लोकात षड्रिपूंना वश करून , विवेक आणि वैराग्यरूपी धन गुरूसहवासाने प्राप्त होते. प्रबोध होतो आणि लवकर मोक्ष प्राप्त होतो असा उल्लेख येतो. अनन्त संसाररुप सागराला पार करण्यासाठी ज्या नौकारुप आहेत, अविचल भक्ति देणाऱ्या आहेत, आळस वा बुद्धिमांद्यरुप जडत्वाच्या सागराला शुष्क करण्यासाठी ज्या वडवानलासमान आहेत त्या गुरूपादुकांना माझा नमस्कार असो असा शेवटच्या श्लोकात उल्लेख आहे. गुरुसहवास हा मोक्षदायक आहे असेच पुराणकारांस म्हणावयाचे आहे.
भवभयतारक प्रबोध देणारे भगवान शंकर रुसले तर गुरु तारून नेतील पण गुरु रागावले तर कोण तारुन नेणार? म्हणून शक्यतोवर गुरूला प्रसन्न ठेवावे असे गुरुगीतेत म्हटले आहे. आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फ़ोट होत असताना गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व कितपत पटेल कुणास ठाऊक? परंतु ‘कसे शिकायचे’ हे कोणीतरी शिकवले असेल तरच उपलब्ध माहितीतून शिकता येते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गुरु हा हवाच…! ‘गुरु रविकर, तमनाशक, अक्षय हे पदी मस्तक…!’-श्रेया महाजन.

This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s