दक्षिणामूर्ती -देवता

आदि शंकराचार्य विरचित ’श्री दक्षिणामूर्ती अष्टकम्’ खूप वर्षे पठनात आहे, परंतु याचा अर्थ मात्र कधी नीट स्पष्ट होत नसे. अगदी खरं सांगायचं तर आपण अर्थापर्यंत जाऊन पोहोचतो आहोत असं वाटत असे, पण तो अचूक नाही यापलीकडे आणखी काही तरी आहे हे जाणवत असे. मुळात ’दक्षिणामूर्ती’ ही देवता म्हणजे नक्की कोणती हेच स्पष्ट झालं नव्हतं. थोडा शोध घेतला, काही चर्चा घडल्या त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती आपणासमोर ठेवण्याचे धाडस करीत आहे.

आख्यायिका:

’दक्षिणामूर्ती’ किंवा ’ज्ञानदक्षिणामूर्ती’ हे शंकराचे गुरुस्वरूप आहे. एका पौराणिक आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाने स्वतःचा कार्यभार सोपवावा या उद्देशाने चार पुत्र निर्माण केले. सनक, सनत्कुमार, सनन्दन आणि सनत्सुजात. या चारही मानसपुत्रांनी उत्तम शास्त्राध्ययन केले. जेव्हा ब्रह्मदेव सारा कार्यभार त्यांच्यावर सोपवून निवृत्त होण्याचा विचार करू लागले तेव्हा नारदमुनींनी ही गोष्ट चारही पुत्रांच्या कानावर घातली. अर्थात, हे त्यांना मान्य नव्हते. मग हे पुत्र खर्‍या ज्ञानाच्या शोधात निघाले. असे ज्ञान देणारे गुरु म्हणून प्रथम भगवान् विष्णुंकडे गेले. तिकडे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत नांदताना पाहून ’हे कुटुंबवत्सल गृहस्थ आपल्याला काय ज्ञान देणार?’ असा विचार त्यांनी केला. भ्रमण करताना कैलासावर पोहोचले. भगवान शंकरांनी त्यांच्या मनातील विचार जाणला. ते एका वटवृ़क्षाखाली तरुणाच्या रूपात ध्यानस्थ बसले. सनकादि ऋषींनी त्या तेजःपुंज तरुणाला पाहून त्याला गुरु म्हणून स्वीकारले. या रूपात भगवान् शंकरांनी त्यांना आत्मज्ञान दिले.

स्वरूप :

’दक्षिणामूर्ती’ याचा शब्दशः अर्थ दक्षिणेकडे मुख असलेली मूर्ती. भारतीय पुरातत्त्वशास्त्रानुसार ’ज्ञानदक्षिणामूर्ती’ अशा रूपातील शिव हा ’चतुर्हस्त’ आहे. वटवृक्षाखाली आसनस्थ आहे. मृगचर्मावर बसून भोवती असलेल्या सनकादि सिध्द ऋषींना ज्ञान देत आहे. ’अपस्मार’ या राक्षसावर त्याने आपला उजवा पाय ठेवला आहे आणि डावा पाय आसनस्थ आहे. ‘अपस्मार’ हा भारतीय पुराणांनुसार अज्ञानाचे प्रतीक आहे.  कधीकधी शिवाच्या अवती भोवती वन्य श्वापदे देखील बसलेली आढळतात. त्याच्या वरच्या दोन हातांपैकी एकात कधी सर्प, कधी माळ, कधी दोन्हीही  आणि दुसर्‍या  हातात मशाल दिसते. खाली असलेला उजवा हात ‘व्याख्यान’ मुद्रेत , तर डाव्या हातात कधी कुश वा वेद दिसतात. त्याचा खाली असलेला डावा हात कधी कधी ‘ज्ञान’ मुद्रेत दिसतो, जे ज्ञान वा तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. कधी कधी हा हात ‘अभय’ मुद्रेत दिसतो, जी आशीर्वाद देणारी, विश्वास निर्माण करणारी आहे.

दक्षिणामूर्ती ही देवता ‘निर्विकल्प समाधी’ अवस्थेत असल्याचे आढळते, जी परमानंदाचा अनुभव घेत असावी असे वाटते. मूर्तिशास्त्रानुसार कधी कधी ‘वीणाधार दक्षिणामूर्ती’  वा ‘ऋषभारूढ दक्षिणामूर्ती’ अशा थोडया वेगळ्या रूपांतही ही देवता आढळते.

प्रतीकात्मता :

भारतीय परंपरा ’गुरु’ ला अतिशय महत्त्व देणारी आहे. शैव परंपरेत दक्षिणामूर्ती ही देवता गुरुणाम गुरु : । म्हणून स्वीकारली आहे. ही देवता म्हणजे आत्मज्ञानाचे मूर्त रूप मानली जाते. अपस्मार या राक्षसाचे पर्यायाने अज्ञानाचे मर्दन करणारी ही देवता आहे. ज्ञान मुद्रेचे स्पष्टीकरण असे दिले जाते –अंगठा हे परमेश्वराचे प्रतीक आहे. आणि तर्जनी हे माणसाचे प्रतीक. उरलेली तीन बोटे म्हणजे माणसातल्या अशुद्धी- अज्ञान,आभास आणि संचित कर्म.  माणूस जेव्हा या अशुद्धिंपासून मुक्त होतो तेव्हा तो परमेश्वर तत्त्वाप्रत जाउन पोहोचतो. अभय मुद्रा ही शिष्यांवरील कृपा दर्शविते. तर हातातील जपमाळ वा सर्प हे तान्त्रिक ज्ञानाचे प्रतीक आहे. हातातील मशाल हे आत्मज्ञानाचे आणि अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याचे प्रतीक आहे.

 

उपासना :

आठवड्यातला पाचवा दिवस हा गुरुचा म्हणून गुरुवार म्हटला जातो. या दिवशी अध्ययनाशी संबंधित कामे आरंभ करणे इष्ट मानले जाते. याच दिवशी शैव परंपरेनुसार दक्षिणामूर्ती या देवतेची उपासना करणे योग्य मानले जाते. काही मंदिरांमध्ये पौर्णिमा, विशेषत: गुरुपौर्णिमा हा दिवस दक्षिणामूर्ती या देवतेच्या आराधनेसाठी योग्य मानला जातो.               

क्रमशः                                                 

.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s