प्रातःस्मरणम्|—श्रेया महाजन.

शंकराचार्यानी रचलेले एक अत्यंत प्रासादिक वेदान्तस्तोत्र असे प्रातःस्मरणम् या स्तोत्राचे वर्णन करता येईल.

मूळ स्तोत्र केवळ तीन श्लोकांचे, पण अत्यंत सारगर्भ आहे.  आत्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन या श्लोकत्रयीमधे आढळते.  वेदान्ततत्त्वज्ञानात नेहेमी वापरला जाणारा ‘रज्जुसर्पन्याय’ या छोट्याशा  स्तोत्रातही दाखला देण्यासाठी वापरला आहे.

प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम्, सच्चित्सुखं परमहंस गतिं तुरीयम्| यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यम्, तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघः||

मी दररोज माझ्या हृदयामधे स्फुरण पावणार्‍या आत्मतत्त्वाचे स्मरण करतो. त्याचे स्वरूप सच्चिदानंदात्मक आहे. आत्म्याच्या चार अवस्था मानल्या जातात. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति (गाढ झोप), आणि चौथी(तुरीय) मोक्षावस्था. हा आत्मा या तीनही अवस्थांमधे नित्य असतो आणि चौथी मोक्षावस्था ही प्रत्येक मुमुक्षुला नेहेमीच हवी असलेली अवस्था आहे.  या चारही अवस्थांमधून जाणारा, शुद्ध ब्रह्मस्वरूप असा आत्मा तो म्हणजे मी आहे, पंचमहाभूतांद्वारे बनलेले हे शरीर नव्हे ही जाणीव मी मनाशी ठेवतो. अर्थात दैनंदिन जीवनात हे शरीर म्हणजे मी असाच आपला समज असतो.  त्या शरीरापेक्षा वेगळे ‘निष्कलं, निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरंजनम्’ असे ज्याचे वर्णन उपनिषदांनी केले त्या परब्रह्म तत्त्वाशी एकरूप असा हा जीवात्मा आहे याची जाणीव रोज प्रातःकाळी करून देणं आवश्यक आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ ही जाणीव यातूनच निर्माण होईल.

प्रातर्भजामि मनसावचसामगम्यम्, वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण|                 यन्नेतिनेतिवचनैर्निगमा अवोचुस्तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम्||

या पुढील श्लोकात वर्णन येते ते असे की आत्मा हा ‘इंद्रियगोचर’ नाही. म्हणजे मन, वाणी इत्यादी ज्ञानेंद्रियांद्वारे त्याची जाणीव होऊ शकत नाही. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी अशा चारही प्रकारच्या वाणी या आत्म्यामुळे प्रकट होतात. याचे वर्णन वेदांतही ‘नेति नेति’ असे केले आहे, ऋषीमुनी देखील याला देवांचा देव, अज, अच्युत, अनादि असेच शब्द वापरतात त्या आत्मतत्त्वाचे मी रोज सकाळी स्मरण करतो.

हे सर्वच शब्द त्या परमतत्त्वाचे वर्णन करण्यासाठी ब्रह्मसूत्रांत, त्यावरील भाष्यांत उपनिषदात, भगवद्गीतेत प्रयुक्त केलेले आढळतात. ब्रह्म हे अनादि आहे, त्याच्या पूर्वी काही नव्हतं ..नासदासीत्, नो सदासीत् असा उल्लेख नासदीय सूक्ताच्या सुरुवातीला आढळतो. सृष्टीके पहले सत् भी नहीं था, असत् भी नहीं था ….सृष्टयुत्पत्तीपूर्वी काहीच नव्हते. ते तत्त्व अज आहे म्हणजे जन्मलेले नाही, अच्युत आहे, अढळ आहे. त्याची जाणीव पंचज्ञानेंद्रियांनी करून घेणे शक्य नाही. किंबहुना हे असे नाही असे   या तत्त्वाचे नकारात्मक वर्णन करण्यात येते. वाणी या तत्त्वामुळे प्रगत होते पण या परब्रह्माचे स्वरूपवर्णन करण्यासाठी ती पुरेशी नाही.

प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णम्. पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम्|                                                            यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ, रज्ज्वां भुजंगमिव प्रतिभासितं वै||

हे तत्त्व अंधःकाराच्या देखील पलीकडचे आहे. सूर्यासारखे तेजस्वी, प्राचीन, पुरुषोत्तमस्वरूप आहे. काळोखामधे पाहिल्यास दोरीवर देखील सापाचा आभास होतो त्याप्रमाणे या तत्त्वावरही विश्वाचा आभास होतो. परंतु यथार्थ ज्ञान झाले की ही दोरीच होती हे कळते, त्याप्रमाणे विश्व देखील मिथ्या आहे, खरे नाही, विनाशी आहे याची जाणीव होते. मगच अनन्त अशा या परब्रह्मतत्त्वाचे खरे स्वरूप जाणता येते.

ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः | हा शंकराचार्यांचा अद्वैतप्रतिपादक सिद्धान्त या छोट्याशा नित्य उपासनेतील स्तोत्रातूनही शंकराचार्य ठामपणे मांडतात.

परमपूज्य सद्गुरु श्री क्षीरसागर महाराज हे देखील याच परंपरेतील होते. त्यामुळे वेळोवेळी त्यानी हे विचार मांडले. आपण सर्व सामान्य माणसे. त्याना समजतील इतके सोपे करून सांगितले. हे प्रथम पुष्प त्याना समर्पित!


सौ श्रेया श्रीधर महाजन.                                                                                                               सनिव्हेल, कॅलिफोर्निया.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~Posted in लेख | 5 प्रतिक्रिया

विषयप्रवेश

गुरोSस्तु मौनं व्याख्यानं,  शिष्यास्तु छिन्नसंशया:|

स्तबक म्हणजे फुलांचा गुच्छ…वेदान्तातील विचारांचा हा पुष्पगुच्छ श्री सद्गुरुचरणी अर्पण!

Posted in संपादकीय-- Home Page | 13 प्रतिक्रिया